https://www.lokmat.com/filmy/marathi-cinema/asambhav-marathi-movie-starring-sachit-patil-priya-bapat-mukta-barve-trailer-released-a-a945/
सचित पाटील दिग्दर्शित ‘असंभव’ या चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टर्सनी प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. रहस्याची चाहूल देणारं ते पोस्टर पाहून सगळेच ‘नेमकं काय?’ या विचारात पडले होते. आणि आता त्याच कुतूहलाला आणखी उंची देत, चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या नजरेतच जाणवतं, हा फक्त एक चित्रपट नसून मन हेलावून टाकणारा एक अनुभव आहे. (Sachit patil mukta barve priya bapat upcoming movie Asambhav Teaser Released)
टीझरमध्ये मुक्ता बर्वे सोबत काहीतरी अघटित घडताना दिसतंय. तिची घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि अचानक घडणाऱ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची वाढली आहे. मुक्ता बर्वे दुहेरी भूमिकेत आहे का? हा प्रश्नही सतत मनात घोळतो. दुसरीकडे प्रिया बापटही एका गूढ भूमिकेत झळकतेय, तिचं पात्र काहीतरी लपवतंय असं जाणवतं. हवेलीत काही गुपितं दडलेली आहेत, कुणाचा तरी खून होताना दिसतो, पण कोणाचा आणि का? सचित पाटील स्वतः या गूढाच्या शोधात आहे, तर संदीप कुलकर्णीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले असून सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘असंभव’ पाहिल्यावर मिळणार आहेत.
या टीझरमधून स्पष्ट होतंय की ‘असंभव’ रहस्यपट असून भावना, थरार आणि अप्रत्यक्षित घटनांनी भरलेला एक मनोवैज्ञानिक प्रवास आहे. या सिनेमात काहीतरी वेगळं, नवं आणि विचार करायला लावणारं आहे, हे काही सेकंदांतच जाणवतं. प्रेक्षकांना कधीही न पाहिलेला सिनेमॅटिक अनुभव देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, नैनितालमधील निसर्गरम्य ठिकाणांवर झालेलं चित्रीकरण, आणि तांत्रिक बाजूंची भव्यता हे सगळंच अप्रतिम दिसतेय.
